सोलापूर- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. अशा परिस्थितीत भाजपचे विधानपरिषदेचे आमदार आणि श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीचे सदस्य सुजितसिंह ठाकुर यांनी चैत्री एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची महापूजा केली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध पंढरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संचारबंदीचे उल्लघंन, आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा- Coronavirus : राज्य मंत्रिमंडळाची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक, लॉकडाऊन वाढण्याची शक्यता
सर्वसामान्य भाविक आणि वारकऱ्यांसाठी श्री विठ्ठल-रुख्मिणीचे दर्शन बंद करण्यात आलेले आहे. असे असताना ठाकुर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातून येऊन विठ्ठलाची महापूजा केली आहे. सध्या सर्वत्र जिल्हाबंदी आणि संचारबंदी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाने घरातच राहून सरकारी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन केलेले आहे. मात्र, भाजपाचेच आमदार ठाकुर यांनी सपत्नीक महापूजा केली होती. त्यांनतर त्यांच्यावर पत्नीसह गुन्हा दाखल केला आहे.
सुजितसिंह ठाकुर यांनी पूजा केल्यानंतर त्यांच्या या कृतीची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मंदिर समितीचे माजी सदस्य वसंतराव पाटील यांनी केली होती. आता पंढरपूर पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ठाकुर यांच्यासोबतच मंदिर समितीचे दुसरे सदस्य संभाजी शिंदे यांनी रुख्मिणी मातेची महापूजा केली होती. संभाजी शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दरम्यान, श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीच्या बैठकीमध्ये आगोदरच ठरल्याप्रमाणे ही महापूजा पार पडल्याचे स्पष्टीकरण समितीच्या वतीने देण्यात आले आहे. सर्वसामान्यांना दर्शन बंद करण्यात आले असले, तरी विठ्ठलाचे नित्योपचार सुरूच राहणार असल्याचे स्षष्ट केले होते. त्यानुसारच ठरल्याप्रमाणे सुजितसिंह ठाकुर आणि संभाजी शिंदे या दोन समिती सदस्याच्या हस्ते ही महापूजा करण्यात आली असल्याचे मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.