सोलापूर - नीरा उजव्या कालव्यातून मिळणाऱ्या अतिरिक्त पाण्याने लाभक्षेत्रातील पाझर तलाव, लघुपाटबंधारे प्रकल्प भरुन घ्यावेत. अशा सूचना सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी दिल्या आहेत. नीरा उजव्या कालव्याच्या धरणसाखळीत समाधानकारक पाऊस होत आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत.
पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले की, नीरा नदीतून कालवा लाभक्षेत्रातील पाझर तलाव आणि लघु पाटबंधारे प्रकल्प भरून घ्यावेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नियोजन करावे. सोलापूर महानगरपालिका आणि सोलापूर जिल्हा परिषदेने आपली पाण्याची मागणी आताच नोंदवावी. त्यानुसार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कालवा नियोजन समितीच्या बैठकीत मागणीनुसार नियोजन करणे सोयीचे होईल. तिसंगी तलाव भरून घेण्यासाठी जलसंपदा विभागाने नियोजन करावे, असेही देशमुख यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी भोसले यांनी सांगितले की, जिल्ह्यात अद्यापही अपेक्षित पाऊस झालेला नाही. ३९० टँकर सुरु असून २७६ चारा छावण्या सुरु आहेत. पाण्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांनी लवकर मागणी नोंदवावी. सध्या पुणे जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण आणि विविध धरणातून सध्या सुरु असलेला विसर्ग पाहता उजनी धरणातील पाणी साठ्यात लक्षणीय वाढ होईल. अजून चांगला पाऊस झाला तर ऑगस्ट महिन्यात धरण भरण्याची शक्यता आहे, असे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगितले. यावर उजनी धरण भरल्यानंतर त्यातील अतिरिक्त पाण्याच्या साहाय्याने हिप्परगा तलाव भरुन घ्यावा, असे महापालिका आयुक्त दीपक तावरे यांना पालकमंत्री देशमुख यांनी सूचना केली. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पंपाची व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पाणी नियोजनाबाबत बैठक झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, लाभक्षेत्र विकास विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, नीरा उजव्या कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता ए. पी. निकम, भीमा पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी अभियंता डी.जे. कोंडेकर, सोलापूर महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता जी. एस. दुलंगे, जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एन. जी. राऊत आदी उपस्थित होते.