सोलापूर - करमाळा तालुक्यातील पोंधवडी गावातील दलित वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनची कामे अपूर्ण असूनही बिल अदा करण्यात आले आहे. पाणी पुरवठा योजनेचे बिल अदा करूनदेखील दलित वस्तीमध्ये पाण्याचा थेंबही पोहचला नाही. पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे.
जिल्हा परिषदेच्या वतीने राबवण्यात आलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे, या योजनेअंतर्गत पोंधवडी गावासाठी सहा लाख रुपयांची पाणी पुरवठा योजना राबवण्यात आली. मात्र त्या ठिकाणी थोडेच काम करुन मोटारही न बसवता पूर्ण कामाचे बिल काढण्यात आले. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी पोंधवडी गावातील युवकांनी केली आहे.
पोंधवडी ग्रामपंचायत येथे पाणीपुरवठा व पेविंग ब्लॉकचे काम मंजूर करण्यात आले होते. या कामात पाईपलाईन, मोटर व विद्युत प्रवाह बसवणे अपेक्षित असताना फक्त काही ठिकाणी पाईप लाईनची कामे पूर्ण झाली आहेत. पुढील कामे न करताच संपूर्ण बिल उचलल्याची बाब पोंधवडी ग्रामस्थांनी पंचायत समितीचे उपविभागीय अभियंता यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच कामाचे बिल काढू नये, यासाठी ९ एप्रिल रोजी पत्र देण्यात आले होते.
या पत्राकडे दुर्लक्ष करत संबंधित अधिकाऱ्यांनी कामाचे बिल काढल्याची तक्रार युवकांच्या वतीने गट विकास अधिकारी श्रीकांत खरात यांच्याकडे करण्यात आली आहे. सदर काम हे दलित वस्तीवरील पाणीपुरवठा योजनेचे आहे तसेच पेवर ब्लॉक ज्या ठिकाणी टाकले आहेत त्या ठिकाणी कोणतीही डागडुजी न करता थेट मातीवरच पेवर ब्लॉक टाकल्याची तक्रार निवेदनात केली आहे. त्यामुळे तेही काम निकृष्ट झाले असून त्याची चौकशी करण्यात यावी, असे निवेदनात नमूद केले आहे.
याबाबत गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांच्याशी संपर्क साधला असता काम मंजूर झाल्यापासून जे काम झाले आहे त्याचे बिल काढले असून संबंधित अधिकाऱ्याने त्याचे मोजमाप करुन बिल दिले. काम अजूनही पूर्ण नसल्याने झालेल्या कामाचेच बिल निघाले आहे. कामापेक्षा जास्त बिल निघाले असतील तर संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन चौकशी करुन त्रुटी आढळल्यास कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.
या कामाबद्दल चौकशी करून संबधीत दोषींवर कारवाई करावी अन्यथा भीमदल संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे संघटनेच्या सुनील भोसले यांनी सांगितले आहे.