सोलापूर - सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात अनेक वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर असलेल्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे आदेश उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी गुरुवारी १० जून रोजी काढले आहे. बाबूगिरी करणाऱ्या किंवा बेकायदेशीररित्या प्रतिनियुक्तीवर असलेल्या सहायक अधीक्षकांना व इतर कर्मचाऱ्यांना तात्काळ त्यांच्या मूळ ठिकाणी पाठवण्याचा आदेश पुणे येथील आरोग्य कार्यालयातून निघाला आहे. यामुळे प्रतिनियुक्तीवर असलेल्या सहायक अधीक्षक, प्रयोगशाळा सहायक आणि अधिपरिचरिका, कक्षसेवक, शिपाई यांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक यांनी संचालकांचे अधिकार वापरले -
सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांची राज्य शासनाने जून २०१९ रोजी सोलापुरात नियुक्ती केली. रुजू झाल्यापासून आजतागायत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी संचालकांचे अधिकार वापरले आहेत. प्रतिनियुक्त्या देताना संचालकांची परवानगी असणे आवश्यक आहे. त्याबाबत १७ डिसेंबर २०१६ रोजी शासन आदेश पारित झाला आहे. पण मर्जितल्या कर्मचाऱ्यांना जिल्हा शल्यचिकित्सक यांनी आपल्या कार्यालयात प्रतिनियुक्त्या दिल्या आहेत. तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी आणि शासनाची परवानगी नसलेल्या प्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात असा आदेश आहे. अगर संबंधित कर्मचारी आपल्या मूळ ठिकाणी रुजू न झाल्यास वेतन रोखावे असे आदेश असताना देखील सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात दहा-दहा वर्षांपासून प्रतिनियुक्त्यावर कामकाज सुरू आहे.
सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची नावे -
शिवकुमार हिरेमठ - प्रयोगशाळा सहायक (मुळ नियुक्ती ग्रामीण रुग्णालय वडाळा), गणेश धोत्रे - सहायक अधीक्षक (मुळ नियुक्ती मोहोळ ग्रामीण रुग्णालय), अनिलकुमार धीमधीमे - सहायक अधीक्षक (मुळ नियुक्ती हत्तीरोग नियंत्रण केंद्र अक्कलकोट), निशिकांत कुलकर्णी - सहायक अधीक्षक (मुळ नियुक्ती ग्रामीण रुग्णालय बार्शी), शाहिदा शेख - अधिपरिचरिका (मुळ नियुक्ती गुप्तरोग चिकित्सालय, सिव्हील हॉस्पिटल सोलापूर), उमेश येडगे - कक्ष सेवक (जिल्हा क्षयरोग केंद्र सोलापूर), प्रदीप लामकाने - कक्षसेवक (मुळ नियुक्ती राज्य राखीव पोलीस बल गट क्रं 10, सोलापूर), बब्रुवान कांबळे - औषध निर्माण अधिकारी (मुळ नियुक्ती उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर), बी.वी.भुरे - शिपाई (मूळ नियुक्ती उपजिल्हा रुग्णालय करमाळा).