पंढरपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरून टीका करणाऱ्या भाजपचे माजी उपजिल्हा अध्यक्ष शिरीष कटेकर यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासून मारहाण केली होती. यानंतर कटेकर यांना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या भेटीसाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत.
कार्यकर्त्यांची संवाद साधणार
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे 12 फेब्रुवारी रोजी 10 सकाळी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर 12 वाजता केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी पत्रकार परिषदेत संवाद करणार आहे.
कटेकर यांना शिवसैनिकांकडून मारहाण
चार फेब्रुवारी रोजी कटेकर यांनी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल शिवराळ भाषेत टीका केली होती. सात फेब्रुवारीला स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी कटेकर यांना काळे फासले होते. यावेळी शिवसैनिकांनी त्यांना मारहाण करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप करून कटेकर यांची सुटका केली होती.
घटनेचा भाजपकडून निषेध
या प्रकारानंतर शिवसेनेच्या वतीने कटेकर यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर, कटेकर यांनी मारहाण प्रकरणी 25 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला होता. त्यातील सतरा शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्या शिवसैनिकांची जामिनावर सुटकाही झाली. शिवसेनेचे जिल्ह्याचे पुरुषोत्तम बेर्डे, शिवाजी सावंत यांनी शिवसैनिकांचा सत्कार केला होता. या घटनेची भाजपच्या राज्यातील नेत्यांनी गंभीर दखल घेतली यामध्ये माजी खासदार किरीट सोमय्या व राम कदम यांनी ट्विटरच्या माध्यमातून या घटनेचा तीव्र निषेध केला होता.