सोलापूर - महाराष्ट्र राज्यातील सर्व मंदिरे खुली करून भजन, कीर्तनाला व काकडारतीला परवानगी द्यावी, अशी मागणी करत अखिल भारतीय वारकरी मंडळाने केली आहे. गुरुवारी सकाळी 29 ऑक्टोबर रोजी 12 वाजता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन करून आंदोलन करण्यात आले, तसेच जिल्हाधिकारी यांना अखिल भारतीय वारकरी मंडळाकडून निवेदन देण्यात आले.
वारकरी भाविकांनी चैत्रवारी, रामनवमी, एकनाथ महाराज उत्सव, हनुमान जयंती, आषाढ वारी, हे सर्व उत्सव घरात बसून साजरे केले. कोरोना महामारीमुळे कुणीही शासन विरोधात भूमिका घेतली नाही. शासनाला सहकार्य केले. मात्र, सध्या राज्यभर व देशभरात सर्व वातावरण मोकळे झाले आहे. शासनाने सर्व दुकानांना व व्यवहारांना परवानगी दिली आहे. म्हणून नित्यनेम करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व मंदिरे टप्प्याटप्प्याने खुली करून भजन व काकडारती करण्यासाठी परवानगी द्यावी, अन्यथा अखिल भारतीय वारकरी मंडळच्यावतीने मुंबई येथील आझाद मैदानावर मोठे जनआंदोलन केले जाईल, असा इशारा सुधाकर महाराज इंगळे यांनी दिला.
यावेळी आंदोलनात बळीराम जांभळे, ज्योतिराम चांगभले, बंडोपंत कुलकर्णी, मोहन शेळके, संजय पवार, कुमार गायकवाड, अभिमन्यू डोंगरे महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.