सोलापूर - जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरीमध्ये पाणी साचून राहिल्याने कांदापीक नासायला सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिली होती. मात्र परतीच्या पावसाने जिल्ह्यात चांगलाच जोर धरला आहे. या सततच्या पावसामुळे कांदा पीक मात्र पिवळे पडून करपू लागले आहे. तर काढणीयोग्य कांदा शेतातच नासू लागला आहे. तसेच कांद्या प्रमाणेच रब्बी हंगामातील माळरानावरील ज्वारी पिकाला या पावसाचा फायदा होणार असला तरी मात्र पावासाचे प्रमाण अति झाल्यास हे देखील पीक वाया जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या पावसामुळे पुढील उन्हाळा सोयीचा जाणार असला तरी सध्या मात्र शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे.