सोलापूर- महाशिवरात्री निमित्ताने सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे. सोलापूर शहरातील प्रमुख चार मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद केले आहे. फक्त मंदिर समितीत असलेल्या वीस सदस्यांना पूजा अर्चना करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर शहरातील इतर शिवमंदिरात गर्दी होणार नाही, अशी व्यवस्था करण्यात यावी, असा आदेश बुधवारी रात्री पालिका आयुक्तांनी काढला आहे.
शहरातील सिद्धेश्वर मंदिर, रेवणसिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर आणि होटगी महाराज मठ या मंदिरात फक्त पुजारी आणि व्यवस्थापकांना परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची महाशिवरात्री साधेपणाने साजरी करावी, असा आदेश शासनाने काढला आहे.
तीन मंदिरे आणि एक मठ वगळता इतर मंदिरात दर्शन-
सोलापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिर, रेवणसिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर आणि होटगी महाराज मठही प्रमुख चार मंदिरे वगळता इतर मंदिरात मात्र रोटेशन पद्धतीने फक्त 20 भाविकांना दर्शन घेता येणार आहे, असा आदेश पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी काढला आहे. यंदाची महाशिवरात्री सणावर कोरोनाचे ग्रहण लागले आहे. मंदिर समितीने भाविकांना ऑनलाइन किंवा केबल टीव्हीद्वारे दर्शन उपलब्ध करून घ्यावे. तसेच इतर परवानगी दिलेल्या मंदिर समितीने मंदिर परिसर निर्जंतुककिकरण करून घ्यावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
महाशिवरात्री निमित्त शासन नियमावली-
1)महाशिवरात्री हा मोठा सण आहे. गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर समितीने गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, सोशल डिस्टन्सचे पालन करावे.
2)कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढले असून रुग्ण संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे भाविकांनी स्वतःची काळजी घेत घरातून पूजा अर्चना करावी. मंदिर समितीने देखील ऑनलाइन दर्शन उपलब्ध करण्याची व्यवस्था करावी.
3)कोविड 19 चा वाढत प्रभाव लक्षात घेता, सिद्धेश्वर मंदिर, रेवणसिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, होटगी महाराज मठ येथे कोणत्याही भाविकास दर्शनासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. फक्त पुजारी आणि मंदिर समिती विश्वस्त यांना पूजा अर्चना करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
4)शहरातील इतर मंदिरात भाविकांना बाहेरूनच दर्शन घेता येणार आहे. गाभाऱ्यात कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच संबंधित मंदिर प्रशासनाने मंदिर परिसराचे निर्जंतुककीकरण करावे. फक्त 20 भाविकांना रोटेशन पद्धतीने दर्शनासाठी परवानगी द्यावी.
5)महाशिवरात्री निमित्ताने मंदिर परिसरात फुल व हार विक्रेत्यांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
6)प्रत्यक्ष मंदिरात येऊन दर्शन घेणाऱ्या नागरिकांना मास्क असणे अनिवार्य आहे.लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मंदिर प्रवेश मनाई केली आहे.