सोलापूर - मुरूम ते पुणे या मार्गावर धावत असलेल्या चालत्या एसटी बसमध्ये वसंत देडे (वय 72 रा, मुरूम जि. उस्मानाबाद) या वृद्धाचा मृत्यू झाला. एसटी वाहक आणि चालकाने प्रसंगावधान दाखवत सोलापूर येथील सरकारी रुग्णालयात बस आणली. परंतु, मृताच्या नातीने एकच गोंधळ केला होता. मृतदेह थेट गावाकडे घेऊन जाण्यासाठी नातीच्या हट्टामुळे प्रशासनाची मोठी दमछाक झाली.
मुरूम ते पुणे अशी (एमएच 14 बीटी 3462) बस मुरूम (जि. उस्मानाबाद) या स्थानकातून निघाली. या एसटी बसमध्ये पुण्याकडे जाण्यासाठी वसंत देडे आपल्या नातीसह बसले होते. एक तासाच्या प्रवासानंतर सोलापूर जिल्ह्यात या बसने प्रवेश केला. बोरामनी गावाजवळ पोहोचल्यानंतर वसंत देडे यांना उलटी झाली आणि जोराचा हृदयविकाराचा झटका आला. यातच त्यांचा मृत्यू झाला.
मृतदेह रुग्णालयात नेण्यास नातीचा नकार
ही सर्व घटना नातीच्या लक्षात येताच तिने धावत्या बसमध्येच गोंधळ करण्यास सुरुवात केली. एसटी चालक, वाहक यांनी प्रसंगावधान बस थेट सरकारी रुग्णालयामध्ये आणली आणि उपचारासाठी दाखल करू असा निर्णय घेतला. मात्र, मृत्यू झालेल्या वृद्ध वसंत यांच्या नातीने रुग्णालयात दाखल करण्यास विरोध केला. माझ्या आजोबांचे मृतहेह सिव्हील रुग्णालयामध्ये दाखल करणार नाही. येथून थेट गावाकडे घेऊन जाणार असल्याची ठाम भूमिका घेतली, अन्यथा गुन्हा दाखल करते असे सांगत होती. एसटीच्या दरवाजामध्येच थांबून ती सर्वांना विरोध करत होती. येथील डॉक्टर कोरोना आहे, असा अहवाल दाखवून शव ताब्यात देत नाहीत आणि परस्पर अंतिम विधी करतात, असे सांगत होती. शेवटी पोलिसांनी व इतर नागरिकांनी मध्यस्थी करून एका खासगी शववाहिकेतून वसंत देडे व त्यांच्या नातीला गावाकडे (मुरूम ता. उमरगा जि. उस्मानाबाद) येथे रवाना केले.