सोलापूर- एटीकेटी व अंतिम वर्षाच्या ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा पुढे ढकलाव्यात या मागणीसाठी एनएसयूआयच्या वतीने मंगळवारी (दि. 6 ऑक्टोबर) दुपारी सोलापूर विद्यापीठात निवेदन देण्यास गेल्यावर निवेदन स्वीकारण्यास कोणी न आल्याने विद्यापीठ परीक्षा नियंत्रकांच्या कक्षाला टाळे ठोकून आंदोलनास सुरुवात केली. यामुळे विद्यापीठात गोंधळ निर्माण झाला होता. परीक्षा नियंत्रक श्रेणीक शहा यांनी तडकाफडकी आदेश काढत 7 व 8 ऑक्टोबर रोजी होणारी ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा रद्द केली आहे.
5 ऑक्टोबरपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाच्या ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा सुरू झाल्या आहेत. पण, पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन असल्याने गोंधळ निर्माण झाला होता. अनेक विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेत प्रश्नपत्रिका सोडविता आली नाही. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी अनेक तांत्रिक समस्यांना तोंड दिले. पण, दुसऱ्या दिवशी म्हणजेच आजही सर्व्हर डाऊनची समस्या पुढे आली. सकाळी 11 वाजता पेपर सुरू होणार होते. पण, सर्व्हर डाऊन किंवा वेबसाईट क्रॅश झाल्याने लॉग इन होत न्हवते. पहिली उत्तरपत्रिका सोडविल्यानंतर दुसरी शीट येण्याऐवजी पहिलीच शीट स्क्रीनवर येत होती. प्रश्न सोडवून झाल्यानंतर सबमिट होत नाही. पून्हा सोडवा असे संदेश स्क्रीनवर येत आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनामुळे मोठा संताप निर्माण झाला आहे. एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेत, विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना याचे निवेदन देण्यासाठी मंगळवारी गेले होते. पण, त्यांना कोणीच वेळ न दिल्याने संतापलेल्या एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ परीक्षा नियंत्रक श्रेणीक शहा यांच्या कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलनास सुरुवात केली. काही वेळानंतर परीक्षा नियंत्रक श्रेणीक शाह आले व त्यांनी परिपत्रक काढून, परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
- परीक्षा नियंत्रक यांचे आदेश
- व्हायरसमुळे सर्व्हर डाऊन झाले आहे. त्यामुळे मंगळवारी झालेली ऑनलाईन परीक्षा पुन्हा 21 ऑक्टोबरला होणार आहे.
- 7 व 8 ऑक्टोबरला होणाऱ्या सर्व ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा 22 व 23 ऑक्टोबरला होणार आहेत.
- 9 ऑक्टोबरची ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा पूर्व नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होईल.
- व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या (अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर) परीक्षा या सर्व्हर डाऊन व वेबसाईट क्रॅशमुळे सकाळी 11.30 ते 4.30 ऐवजी दुपारी 3 ते 9 या वेळात होणार आहे.
- पारंपरिक अभ्यासक्रमाच्या परिक्षांमधील वेळेत कोणताही बदल झालेला नाही.
हेही वाचा - हरवलेल्या आईने वर्षभरानंतर पाहिले पोटच्या गोळ्याला अन् फोडला हंबरडा...