सोलापूर (पंढरपूर) - माघवारी जयाशुध्द एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न झाली. यावेळी श्री विठ्ठलाची पुजा मंदिर समितीच्या सदस्या अॅड. माधवी निगडे यांच्या उपस्थितीत झाली. रुक्मिणी मातेची पूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या उपस्थित संपन्न झाली. यावेळी मंदिर समितीचे सदस्या शकुंतला नडगिरे, मंदिर समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. माघवारी जयाशुध्द एकादशी निमित्त मंदिरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीमार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
विठ्ठल मंदिर परिसरात शुकशुकाट
विठ्ठल मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र विठ्ठल मंदिर परिसरात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मंदिर परिसरातील चौफाळा, महाद्वार, पश्चिम द्वार, उत्तर द्वार नामदेव पायरी या भागांमध्ये पोलिसांचा मोठा पोलिसांचा फौजफाटा आहे. काही मोजक्याच वारकऱ्यांना प्रदक्षिणेची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. चंद्रभागा नदीवरही भाविक नसल्याने शुकशुकाट आहे.
पंढरपुरात येणारे सर्व रस्ते बंद
माघवारी सोहळा रद्द करण्यात आला. जिल्हा प्रशासनाकडून एक दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंढरीत सुमारे दीड हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. तर पंढरपूरकडे येणारे सर्व रस्ते नाकाबंदीद्वारे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पंढरपूरात कोणत्याही भाविकाला वारकऱ्याला प्रवेश दिला जात नाही.