सोलापूर - 'पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळा, त्यांचा मैदानात पराभव करा' या मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांच्या भूमिकेचे आमदार नितेश राणे यांनी समर्थन केले आहे. क्रिकेटच्या मैदानात पराभवानंतर त्यांचे हरलेले चेहरे प्रत्येक भारतीयाला पाहायचे आहेत, असे ते म्हणाले. ते सोलापूरमध्ये आले असता बोलत होते.
आम्हाला आमच्या भारतीय क्रिकेट संघावर पूर्ण विश्वास आहे. म्हणून पाकिस्तानला सोप्प जाऊ देणार नाही. म्हणून त्यांच्याशी क्रिकेट खेळायला हवे, असेही राणे यावेळी म्हणाले. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाक विरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालून २ गुण गमावाणे योग्य होणार नसल्याचे ते म्हणाले.
क्रिकेटच्या मैदानात पाकला हरवूनच पुलवामा हल्ल्यातील जवानांच्या बलिदानाचा बदला घेतला पाहिजे, असे वक्तव्य सचिन तेंडुलकरने केले होते. तर पाकवर बहिष्कार म्हणजे आपलाच पराभव असल्याचे सुनील गावस्कर म्हणाले होते. त्यामुळे कधीकाळी भारतीयांच्या गळ्यातील ताईत असणारे हे दोन्ही खेळाडू सध्या टीकेचे धनी बनले आहेत. समाज माध्यमापासून टीव्ही चॅनेल्स त्यांना देशद्रोही ठरवत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांना तेंडुलकर आणि गावस्कर यांच्या भूमिकेबद्दल विचारल्यावर त्यांनी या दोन दिग्गजांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. अशा वातावरणात येत्या १६ जूनला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील होणारा समाना खेळला जाणार का? याचे उत्तर आता तरी कोणालाच माहीत नाही. परंतु, या मुद्द्यावरुन देशात वादंग निर्माण झाले आहे.