सोलापूर - आगामी लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष ५ जागांवर लढणार आहे. हे पाचही उमेदवार शिवसेनेची ताकद असणाऱ्या मतदारसंघात उभे केले जातील. या निवडणुकीत आमचा क्रमांक एकचा शत्रु शिवसेना आहे, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे.
स्वाभिमान पक्ष बांधणीसाठी नितेश राणे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोलापुरात पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्यासोबत स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगदीश बाबर आणि शहराध्यक्ष सुनिल खटके उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपची युती झाली आहे. तसेच, काँग्रेस - राष्ट्रवादीचीही आघाडी झाली आहे. पण, अनेक जण उमेदवारी न मिळाल्याने नाराज झाले आहेत. असे नाराज इच्छुक उमेदवार स्वाभिमान पक्षाच्या संपर्कात असून, त्यांचा पक्षाला फायदा होणार असल्याचे राणे म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेला रोखण्यासाठी सत्ताधारी भाजपने खेळलेला हा डाव आहे. नारायण राणे हे भाजपच्या कोट्यातून खासदार आहेत. त्यांच्या पक्षाचा हा पावित्रा म्हणजे, शिवसेनेचे पंख छाटण्यासाठी भाजपने खेळलेली खेळी असल्याचे बोलले जात आहे.