पंढरपूर(सोलापूर)- जिल्ह्यात सध्या वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे. वाळूची तस्करी राजरोपणे सुरूच आहे. यावर पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे कोळा येथील ओढ्यातून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या नऊ वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून वाळूसह तीन जेसीबी व सहा ट्रॅक्टर असा एक कोटी दोन लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास गस्ती पथकाने ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या कारवाईमध्ये नऊ जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मच्छिंद्र सांगोलकर (रा. तिप्पेहळ्ळी, ता. सांगोला) सुनील जाधव (रा. फुलेवाडी, ता. तुळजापूर) बबन राठोड (मुस्ती, ता., दक्षिण सोलापूर), सचिन गडदे (रा. गोरवाडी, ता. सांगोला) महादेव देशमुख, लक्ष्मण माने, जगन्नाथ सरगर, अक्षय सरगर (सर्व रा. काेळा) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
तीन जेसीबी व तीन ट्रॅक्टर एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगोला तालुक्यातील कोळा येथे ओढ्यातून अवैधरित्या वाळूची तस्करी होत असल्याची माहिती सांगोला पोलिसांना मिळाली. त्यानंतर सांगोला पोलीस यांनी एक पथक तयार करून त्या ठिकाणी धाड मारली असता. वाळूतस्कर हे अवैधरित्या वाळूची चोरी करताना आढळून आले. या कारवाईमध्ये पोलिसांनी वाळू तस्करांकडून तीन जेसीबी, तीन ट्रॅक्टरसह वाळूने भरलेल्या ट्राॅलींचा जप्त केलेल्यात समावेश आहे. यामध्ये एक कोटी 2 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सांगोला पोलिसांनी दिली आहे.