सोलापूर - अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात कोल्हापूर, मुंबई येथील पारंपारिक भजनी मंडळांच्या भावभक्तीच्या गीतांनी नुतन वर्षाचे उत्साहाने स्वागत करण्यात आले. दिनांक ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षास निरोप व नुतन वर्षाच्या स्वागताकरीता राज्यातील विविध जिल्ह्यांसह देश विदेशातून असंख्य भाविकांची मांदियाळी वटवृक्ष मंदिरात विसावली होती.
हेही वाचा... गुलाबराव पाटलांचे जळगावात जंगी स्वागत; मिरवणुकीत चेंगराचेंगरी, दोन महिला शिवसैनिक जखमी
थर्टी फस्ट विशेष आकर्षण असलेल्या कोल्हापूर येथील भजनी मंडळांच्या भजन गीतांनी नुतन वर्षाच्या स्वागतीय कार्यक्रमांना देवस्थान परिसरात सुरुवात झाली. कोल्हापूर येथील श्री साई समर्थ भजन मंडळ यांच्या सुनिल देशमाने प्रस्तुत 'नुतन वर्ष हे स्वामींच्या चरणी' या भजन गीतांच्या कार्यक्रमात गणेश वंदन गीत सादर करून उपस्थित भाविकांची उत्सुकता वाढविली. यानंतर अनेक सत्पुरुष संतांच्या भारुडरूपी भजन गीतांसह अनेक भक्तीगीते सादर करण्यात आली. यातून भारतीय संस्कृतीचे व आध्यात्माचे आदर्श जगासमोर मांडले.
हेही वाचा... ठाकरे सरकारचे खातेवाटप लवकरच.. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरूच
रात्री शेज आरतीनंतर कोल्हापूरच्या गंगावेश येथील उत्तम निगवेकर यांच्या ओम स्वामी चैतन्य भजनी मंडळ, मगरमठी येथील श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, दादर मुंबई येथील स्वामी ओम भजनी मंडळ यांच्याही भक्ती गीतांच्या कार्यक्रमात भाविक भक्ती रसात रंगून गेले. रात्री 10 ते पहाटे 4 या वेळेत या भजनी मंडळांचा कार्यक्रम पार पडला. रात्री १२ वाजता असंख्य फटाक्यांच्या आतषबाजीने मोठया उत्साहात नुतन वर्षाचे स्वागत केले गेले. सर्व भाविकांनी एकमेकांना नुतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी सर्व भजनी मंडळाच्या प्रमुखांचा यथोचित सन्मान केला. तसेच नुतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा.... देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला अर्थमंत्री जयंत पाटलांचे जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले...
ओम स्वामी चैतन्य भजनी मंडळाच्या उत्तम निगवेकर व सहकाऱ्यांनी अनेक भावभक्ती गीते व सोंगी भारुड सादर केले. या कार्यक्रमातील अनेक भक्तीगीतांचा राज्यातील व अक्कलकोट शहरातील अनेक अबालवृध्दांनी आनंद लुटला. हा सर्व कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता व सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरीता मंदिर विश्वस्त समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे पदाधिकारी, कर्मचारी, सेवेकरी व भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.