पंढरपूर : राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेशकरणार आहेत. 27 जून रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या बीआरएस प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार आहे. मागील महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती शेतकरी मेळाव्याला उपस्थिती लावली होती. तेव्हा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यादरम्यान पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी अभिजीत पाटील यांना राष्ट्रवादीकडून विधानसभेची उमेदवार देण्याचे संकेत शरद पवार यांच्याकडून देण्यात आले होते. तेव्हापासून पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादीमध्ये दुफळी निर्माण झाली होती.
चंद्रशेखर राव भगीरथ भालकेंची गुप्त भेट : गेल्या काही दिवसांपासून भगीरथ भालके यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची त्यांच्या कुटुंबासह तेलंगणात भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्या भेटीत त्यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. भगीरथ भालके यांनी तेलंगणाला जाण्यासाठी पुण्याहून विमानाची खास व्यवस्था केली होती. के. चंद्रशेखर राव यांनी भगीरथ भालके यांना पक्षात येण्याचे संकेत दिले असता, कार्यकर्त्यांचा विचार करून निर्णय घेणार असल्याचे भालके यांनी सांगितले होते. मध्यंतरी पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांच्या चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होती. त्या निवडणुकीत चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत नेते भगीरथ भालके हे स्टार प्रचारक होते. या निवडणुकीत कल्याणराव काळे यांचे संपूर्ण पॅनल सोळाशे मतांनी विजयी झाले होते.
स्वाभिमान जपण्यासाठी राष्ट्रवादी सोडली : भगीरथ भालके यांनी मंगळवेढा येथे 24 जून रोजी पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करत बीआरएस प्रवेशाबाबत चर्चा केली होती. तसेच आज त्यांनी पंढरपूर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे. या भेटीत भगीरथ भालके यांनी स्वाभिमान जपण्यासाठी राष्ट्रवादी सोडत असल्याचे कार्यकर्त्यांना सांगितले. तसेच सर्वांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समितीत प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली आहे. प्रवेश सोहळ्यास सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भगीरथ भालके यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुक चुरशीची होणार : पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे मोठे वर्चस्व होते. 2019 मध्ये भारत भालके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले, तेव्हा भगीरथ भालके यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवली. त्यात भाजपच्या उमेदवार साधना आवताडे यांनी भगीरथ भालके यांचा अवघ्या 3600 मतांनी पराभव केला होता. भगीरथ भालके यांना मानणारा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात मोठा वर्ग आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत तेलंगणातील बीआरएसला तगडा उमेदवार मिळाल्याची चर्चा आहे. भगीरथ भालके यांनी बीआरएसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुक चुरशीची होणार आहे.