पंढरपूर - पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे वारे जोमाने वाहू लागले आहे. त्याचप्रमाणे इच्छुकांच्या गर्दीही वाढताना दिसत आहे. त्यातच आता प्रमुख पक्षातील नेतेही जनसंपर्कासाठी धावाधाव सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांचे बंधू उमेश परिचारक यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शनिवारी कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर त्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. त्यातूनच राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजपवासी झालेले नेते परतीच्या मार्गावर -
दीड वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले त्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाचे नेते सत्तेत आले. यामुळे राज्य व जिल्ह्यातील सत्ता समीकरणे पूर्णत: बदलली गेली. भाजप सत्ता येणार या हेतूने भाजपवासी झाले. अनेकजण परतीच्या मार्गाने महाविकासाकडे येण्याचा प्रयत्न करत आहे. दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या मृत्यूनंतर शरद पवार यांनी पंढरपूर दौरा केला होता. त्या दौर्यामध्ये भाजप नेते कल्याणराव काळे यांनी पवार यांच्या व्यासपीठावर हजेरी लावली होती. त्यातूनच आता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणूक लागणार आहे. या निवडणुकीतून उमेश परिचारक यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
पवार परिवाराचे सोलापूर जिल्ह्यावर विशेष प्रेम -
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सोलापूर जिल्ह्यात विशेष प्रेम आहे. सोलापूर जिल्ह्यातील सहकारी संस्था असतील कारखाने असतील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. सध्या महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे या संस्थांना बळ मिळताना दिसत आहे. त्यातूनच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला होता. पंढरपूर येथे विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, पोटनिवडणुकीसाठी शरद पवार यांच्या मनात तीन उमेदवार असल्याची फिरकी त्यांनी टाकली होती. त्याचवेळी त्यांनी जिल्ह्यातील काही भाजपचे नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यातच शनिवारी शरद पवार व उमेश परिचारक एकाच व्यासपीठावर असल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
उमेश परिचारक कोण?
सोलापूर जिल्ह्याचे भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांचे बंधू आहेत. तसेच मंगळवेढा तालुक्यातील युटोपियन शुगर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आहेत. पांडुरंग परिवाराच्या राजकारणातील पडद्यामागची सूत्रधार म्हणून उमेश परिचारक यांच्याकडे पाहिले जाते. युटोपियन शुगरच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यामध्ये आपली राजकीय ताकद त्यांनी वाढवली आहे. सहकार क्षेत्राचा त्यांना दांडगा अनुभव आहे.
इच्छुक उमेदवारांची चर्चा -
सोलापूर येथे शरद पवार व उमेश परिचारक एकाच मंचावर उपस्थित होते. त्याचवेळी नामदेव पायरी येथील कृषी विधायकाला पाठिंबा देण्यासाठी आमदार प्रशांत परिचारक, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांचे भजन-किर्तन आंदोलन पंढरपूर येथे सुरू होते. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांची चर्चा जोरदार आहे.