सोलापूर- चित्रकलेचे वातावरण निर्माण व्हावे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत असलेल्या चित्रकाराचे मार्गदर्शन मिळावे यासाठी राष्ट्रीय पातळीवरील आर्ट कॅम्पचे शहरात आयोजन करण्यात आले आहे. कलादृष्टी आर्ट कॅम्प २०२० असे या कॅम्पचे नाव असून ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सचिन खरात यांच्या स्टुडिओमध्ये भरणार आहे.
जिल्ह्यात कलेचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सचिन खरात यांच्या स्टुडिओमध्ये या आर्ट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. ६ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी, असे ४ दिवस हा कॅम्प चालणार आहे. या कॅम्पमध्ये देशभरातून निवडक असे चित्रकार विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती चित्रकार सचिन खरात यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. चित्रकला शिकताना महाविद्यालयातून शिकलेली चित्रकला आणि प्रत्यक्षात काम करताना प्रसिद्ध चित्रकारांच्या नजरेतून व त्यांच्या कुंचल्यातून साकार होणारी चित्रे विद्यार्थ्यांना पाहता यावी व शिकता यावीत. तसेच, या सर्वांच्या माध्यमातून शहरामध्ये कलेचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी हा आर्ट कॅम्प आयोजित करण्यात आला असल्याचे खरात यांनी सांगितले.
मुंबईतील एनएबी आर्ट स्टुडिओ आणि जयम डी ट्रस्ट यांनी या उपक्रमाला स्पॉन्सर केले असून शहरातील चित्रकारांनी देखील कॅम्पचा लाभ घ्यावा, असे आवाहन चित्रकार सचिन खरात यांनी केले आहे. तसेच शहरातील प्रेक्षकांनी देखील दिनांक ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी चित्रकार सचिन खरात यांच्या आसरा चौकातील स्टुडिओमध्ये येऊन या राष्ट्रीय पातळीवरील कॅम्पला भेट द्यावी, असे आवाहन केले आहे. ६ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी या ४ दिवसाच्या काळात विद्यार्थ्यांना खूप काही शिकण्यासाठी मिळणार आहे. चित्र काढत असताना चित्र बघायचे कसे हे देखील या कॅम्पमध्ये शिकायला मिळणार आहे.
हेही वाचा- सोलापुरातील वखारीला भीषण आग, ५० लाखाहून अधिकचे नुकसान