सोलापूर - आता गप्प बसून चालणार नाही. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील नागरिक आता मंत्र्यांची वाहने अडवणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे नेते नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. ते सोलापूरमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या बैठकीत बोलत होते. आजपर्यंत मूक मोर्चे पाहिले, आता ठोक मोर्चेही बघा असंही यावेळी पाटील यांनी म्हटले आहे.
कोल्हापूरनंतर आता सोलापुरातही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी आज अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोलापुरात बैठक झाली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले. या बैठकीला किरण पवार, शहाजी पवार, आमदार सुभाष देशमुख, राम जाधव, श्रीकांत घाडगे, शाम कदम यांची उपस्थिती होती.
राज्यभरात मराठा समाजाच्यावतीने ठोक मोर्चाचे आयोजन - पाटील
सर्वोच्च न्यायालयाने 5 मे रोजी मराठा समाजाच्या आरक्षण रद्दचा निर्णय दिला. आज 12 जून आहे, अद्यापही राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल केली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाच्या बाजूने आहे का नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता तरुणांनी अंगावर केसेस दाखल करून घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. आजतागायत 58 मूक मोर्चे झाले, आता 58 ठोक मोर्चे काढू, मराठा समाजातील मंत्र्यांमध्ये जोपर्यंत मराठा समाजाची दहशत होत नाही, तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, असेही यावेळी नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे. मराठा समाजाच्यावतीने यापुढे करण्यात येणारे आरक्षण हे अतिशय तीव्र असेल. मराठा समाज मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. ओबीसीचे नेते त्यांच्या आरक्षणासाठी प्रयत्न करतात, मग मराठा समाजातील नेते गप्प का? असा सवालही यावेळी नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा -पदोन्नतीच्या आरक्षणाबाबत 21 तारखेनंतर भूमिका जाहीर करणार - ऊर्जामंत्री