सोलापूर - नागराज मंजुळे हे लहानपणी कुस्तीचे शौकीन होते. लहानपणापासून आपण नारायण पाटील यांच्या कुस्तीचे शौकीन होतो, असे नागराज मंजुळे यांनी सांगितले आहे. तरुण वयात कुस्तीचे मैदान गाजवणारे नारायण पाटील हे सध्या करमाळ्याचे आमदार आहेत. लहानपणी नारायण पाटलांच्या कुस्त्या पहायला जायचो, असे मंजुळे यांनी सांगितले.
आमदार नारायण पाटील यांच्या कुस्तीचा मी लहानपणापासूनचा शौकीन आहे. लहानपणी मी माझ्या वडिलांबरोबर नारायण आबांच्या कुस्त्या बघायला जायचो. आमदार नारायण (आबा) पाटील हे माझ्यासाठी एक हिरो आहेत, असे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी कर्मयोगी व्याख्यानमालेवेळेस बोलताना सांगितले.
भारत महाविद्यालय जेऊर येथे कर्मयोगी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागराज मंजुळे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्याबरोबर मुक्त संवाद साधला. यावेळी बोलताना नागराज मंजुळे यांनी त्यांच्या जीवनातील अनेक जुन्या गोष्टींना उजाळा दिला व म्हणाले की, तुम्ही जसे माझे फॅन आहात तसा मी लहानपणी पैलवान आमदार नारायण पाटील यांचा फॅन होतो, असे सांगितले.
मी माझ्या वडिलांबरोबर नारायण आबांच्या कुस्त्या पाहण्यासाठी जायचो. पैलवान आमदार नारायण पाटील हे माझ्यासाठी एक हिरोच असल्याचे मंजुळे म्हणाले. यावेळी आमदार नारायण पाटील बोलताना म्हणाले की, नागराज मंजुळे यांनी जेऊर गावाचे नाव सर्वत्र प्रसिद्ध केले आहे. नागराज आमच्या गावचा असल्याचा आम्हाला अभिमान आहे. यावेळी व्यासपीठावर आमदार नारायण पाटील, संजय चौधरी, अनंत शिंगाडे, हनुमंत धालगडे, अर्जुन सरक, भूषण मंजुळे, अरबाज शेख, सोमनाथ अवघडे हे उपस्थित होते.