सोलापूर - भारतीय सैन्य दलात भावाची भरती झाल्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील तोगराळी येथील नागनाथ जमादार या सैनिकाने तोगराळी ते पंढरपूर असे 90 किलोमीटरचे अंतर धावत पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले.
हेही वाचा - मृत मुलाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अस्थींवर वृक्षारोपण
पंडित शंकर जमादार यांचा मुलगा नागनाथ जमादार हा सैन्यात उदमपुर, जम्मू काश्मीर येथे 4 वर्षापासून कार्यरत आहे. त्याचा भाऊ नवनाथ जमादार हा देखील सैन्यात भरती झाला आहे. सध्या नवनाथ हा बंगळुरु येथे ट्रेनिंग घेत आहे. नागनाथ जमादार यांची आपला भाऊ आपल्याबरोबर सैन्यात भरती व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. जोपर्यंत आपला भाऊ सैन्यात भरती होत नाही, तोपर्यंत आपण विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणार नाही, असा पण केला होता.
हेही वाचा - महिलांवरील अत्याचार प्रकरणात तातडीने कारवाई करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश
अलीकडेच नवनाथ हा सैन्यदलामध्ये भरती झाला. भरती झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना खूप आनंद झाला. विठ्ठलाच्या कृपेने आपला भाऊ सैन्यामध्ये दाखल झाला, अशी त्यांची भावना आहे. त्याच भावनेपोटी नागनाथने आपल्या तोगराळी ते पंढरपूर पर्यंतचे तब्बल 90 किलोमीटरचे अंतर अवघ्या 12 तासात सलग धावत पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांसोबत विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. जमादार यांच्या आगळ्यावेगळ्या विठ्ठल भक्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.