सोलापूर - करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील उजनी पाणलोट परिसरातील काही गावात जमिनीतून गुढ आवाज आल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. या आवाजामुळे परिसरात घबराट निर्माण झाली असून भूकंप असल्याच्या भितीने येथील गावातील नागरिकांनी लहान मुलांसह घराबाहेर पळ काढला.
करमाळा तालुक्यातील केतूरसह केतूर नंबर एक, पोमलवाडी, हिंगणी, राजुरी, पारेवाडी, दिवेगव्हाण, वाशिंबे, जिंती, गोयेगाव, सावडी, कुंभारगाव, देलवडी परिसरात गुरुवाकी रात्री नऊच्या सुमारास जमिनीतून मोठा आवाज आला. या आवाजाने सर्वत्र घबराट निर्माण झाली होती. या आवाजाने परिसरातील मजबूत घरे हादरली, तर पत्र्याच्या घरातीत भांडी खाली पडली. लहान मुले रडू लागली त्यामुळे नागरिक घाबरून घराबाहेर पळाले. भूकंप झाला की गॅसचा स्फोट झाला, याविषयी तर्क-वितर्क चालू होते. गूढ आवाज नेमका कशाचा झाला ? हे मात्र समजू शकले नाही.