सोलापूर - पंढरपुरातील वीजयंत्रणा पूर्व पदावर आली आहे. बाधित झालेल्या 325 गावांपैकी संजवाड गाव बंद आहे. विविध ठिकाणीचे पाणी ओसरताच या गावचा वीजपुरवठाही पूर्ववत करण्यात येईल. जिल्ह्यात महापुरामुळे महावितरणचे सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
उजनी व वीर धरणातून विसर्ग वाढल्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहिली. त्यामुळे जिल्ह्यातील 51 वीज उपकेंद्रे बाधित झाली होती. यामध्ये दोन ठिकाणी अतिउच्चदाबाचे मनोरे कोसळल्याने 12 वीज उपकेंद्रे बंद पडली. परंतु, दिवसभरात पर्यायी मार्गाने ती सुरू करण्यात आली आहेत. बाधित झालेल्या गावांची संख्या 325पर्यंत गेली होती. टप्प्या-टप्प्याने 324 गावांचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. पाणी कमी होताच संजवाड गावाचा वीजपुरवठाही सुरू होईल. या गावात घरगुती वीजचे 300 ग्राहक बंद आहेत.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता, संचालक (संचालन) सतीश चव्हाण, प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेतला. खांब, ऑइल व इतर साहित्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 882 विजेचे खांब कोसळले आहेत. 8 हजार 707 रोहित्रे बाधित झाली आहेत. ही सर्व रोहित्रे सुरू करण्यासाठी लागणारे ऑइल मुख्यालयाने पुरेशा प्रमाणात दिले आहे. आतापर्यंत पाच हजार 448 रोहित्रे सुरू केली आहेत.