पंढरपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमएस-सीआयटी संगणक प्रशिक्षण केंद्र मागील पाच महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी या संस्थाचालकांना मोठ्या अर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो आहे. त्यासाठी लवकरात लवकर केंद्र चालू करण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन पालकमंत्री दत्ता भरणे यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह सोलापूर जिल्हा समन्वय रोहित जेऊरकर, हरुण शेख, सचिन तिकटे, भोसले सर, रोहित शिरोळकर व गणेश इराबत्ती सर आदी केंद्रचालक उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यामध्ये अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्रात १४० संस्था चालकांचा समावेश आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सध्याच्या काळात जगभरातील तंत्रज्ञान, पुरवठा साखळी, रोजगार आणि भांडवल क्षेत्रावर मोठा आर्थिक परिणाम झाला आहे. एमएस-सीआयटी संगणक अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारे संस्थाही बंद करण्यात आल्या.
मागील पाच महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाऊनमुळे या प्रशिक्षण केंद्र बंद आहेत. केंद्र जरी बंद असले तरी त्यांचा खर्च सुरूच आहे. जागेचा भाडे, लाईटबील, इंटरनेट बील भरणे त्यांना कठीण जात आहे. त्याचबरोबर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे त्यांना कठीण जात आहे. प्रत्येक एमएस-सीआयटी संगणक प्रशिक्षण केंद्रामध्ये जवळपास दहा ते वीस पेक्षा जास्त संगणकची अध्यावत लॅब आहे.
या सर्व परिस्थितीत प्रशिक्षण संस्था चालकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी शासनाने आर्थिक पॅकेज द्यावे व दिलेल्या निर्देशानुसार प्रशिक्षण संस्था सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.