सोलापूर - शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले याचे उत्तर ईडीला घाम फुटल्यानंतर अमित शाह यांना मिळाले आहे, असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.
मोहोळ विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचारासाठी नान्नज येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमोल कोल्हे हे बोलत होते. शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले, असा सवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला होता. शरद पवार हे स्वतः ईडीच्या कार्यालयात जायला निघाले त्यावेळी राज्याच्या गृहखात्यातील वरिष्ठ अधिकारी हे पवार साहेबांना विनवणी करीत होते. शरद पवार येणार म्हणटल्यावर ईडीला देखील घाम फुटला होता. ईडीला घाम फुटल्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले, याची जाणीव अमित शाह यांना नक्कीच झाली असेल, असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला. देशात सध्या हुकूमशाही पद्धतीने सरकार चालविले जात असल्याचा आरोपही कोल्हे यांनी यावेळी केला.