सोलापूर- 'मोहिते पाटील म्हणजे १० वर्षांपूर्वीच मोडीत निघालेले भांडे आहे. या मोडीत निघालेल्या भांड्याला शरद पवार यांनी कल्हई करून करून ते जिवंत ठेवले. त्यामुळेच मोहिते पाटील हे आजपर्यंत टिकले,' अशी टीका माढ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी केली आहे.
'शरद पवारांनी मोहिते पाटलांना सर्व पदे दिली. जनतेने मोहिते पाटलांचा पराभव केल्यावरदेखील पवारांनी त्यांना पदे दिली. असे असतानाही आमच्यावर अन्याय झाला असे मोहिते पाटील म्हणत आहेत. असे म्हणणे चूकीचे आहे. ते कृष्णा-भीमा स्थिरीकरणासाठी नव्हे; तर, स्वतःच्या कुटुंबाच्या स्थिरीकरणासाठी भाजपमध्ये गेले आहेत,' अशी टीकाही संजय शिंदे यांनी केली आहे.
'मोहिते-पाटील राष्ट्रवादीचे नेते म्हणून जिल्ह्यात वाढले. ते आता स्वार्थासाठी भाजपात गेले. ते कृष्णा-भीमा स्थिरीकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याचे सांगत आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ही योजना होणार नाही, असे अनेकदा सांगितले आहे. पुढच्या तीन पिढ्या हे स्थिरीकरण शक्य नाही, असा दावा मुख्यमंत्री यांनी केलेला होता. अशा परिस्थितीत ते नक्की कोणाचे स्थिरीकरण करण्यासाठी हे भाजपात गेले,' असा सवाल शिंदे यांनी केला.
माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ हा माढा तालुक्यातील उजनी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या रांजणीमध्ये फोडण्यात आला. रांजणी येथील ओंकारेश्वर मंदिरात नारळ फोडून संजय शिंदे यांच्या प्रचाराचा सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते. आमदार बबन शिंदे, माजी आमदार विनायक पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.