सोलापूर- महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे 'मी राष्ट्रवादीतच' या वक्तव्याने त्यांच्या पारंपरिक राजकीय विरोधकांची झोप उडवली आहे. त्यामुळे, विरोधकांपैकी एक असलेल्या माळशिरसच्या उत्तम जानकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोहिते-पाटलांवर टीका केली आहे.
राज्यातील जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटलांनी मी राष्ट्रवादीतच आहे, असे वक्तव्य करून सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्याची इज्जत घालवली, असा घणाघात उत्तम जानकारांनी केला आहे. विजयसिंह मोहिते पाटलांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये आहेत. त्यामुळे, मोहिते पाटील घराण्यातच ताळमेळ नाही. एवढच नव्हे तर, मोहिते पाटलांनी विधानसभा निवडणुकीत सोलापूर तसेच आजू-बाजूच्या जिल्ह्यात ज्या उमेदवारांचा प्रचार केला त्यातला एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे, येणाऱ्या काळात मोहिते पाटलांनी असे वक्तव्य करने टाळावे, असे आवाहन माळशिरस मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार उत्तम जानकर यांनी केले आहे.
विजयसिंह मोहिते पाटलांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी गत लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर अकलूजला पंतप्रधान मोदींची भव्य सभाही घेतली. त्यावेळी खुद्द विजयसिंह भाजपात जातील असे आडाखे लावले जात होते. मात्र, त्यांनी फक्त मोदींच्या व्यासपीठावर हजेरी लावली. ते अधिकृतरित्या भाजपमध्ये गेले नाहीत. त्यामुळे विजयसिंह नेमके कोणाचे, या प्रश्नाचे उत्तर नव्हते. पण, काल पुण्यात वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांना आपण राष्ट्रवादीत असल्याची प्रतिक्रिया देऊन राजकीय भूकंप केला आहे.
हेही वाचा- सोलापूर : राज्यपालांनी घेतले अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे दर्शन