सोलापूर - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिर समितीच्यावतीने दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारीपासून म्हणजे येत्या नवीन वर्षापासून करण्यात येणार आहे.
दररोज देशाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो भाविक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात. सध्या मंदिरात भाविकांना मोबाईलसह प्रवेश मिळत असल्याने भाविक दर्शन रांगेमध्ये आणि विठ्ठलासमोर सेल्फी घेताना आढळून येतात. त्यामुळे दर्शनासाठी इतर भाविकांना वेळ लागतो. त्यामुळे वादावादी होत असल्याचे आढळून आले आहे. शिवाय मंदिराचे पावित्र्य जपले जावे आणि भाविकांमध्ये सात्विक भाव निर्माण व्हावा. पर्यायाने सर्वांनाच शांतीने दर्शन घेता यावे यासाठी मंदिर समितीने मोबाईल बंदीचा निर्णय घेतला आहे.
येत्या नव्या वर्षात या मोबाईल बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे भाविकांच्या मोबाईलची सुरक्षा, त्याचे व्यवस्थापन अर्थात भाविकांना मोबाईल ठेवण्यासाठी समितीकडून सोय करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.