पंढरपूर- (सोलापूर) मराठी भाषेवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अमेझॉन यांच्यात सुरू असलेला वाद आता ग्रामीण भागापर्यंत येऊन पोहोचला आहे. पंढरपूर येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून अमेझॉन कार्यालय बाहेरील पोस्टरला काळे फासून आंदोलन केले गेले. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यामुळे मनसे आता राज्यातही आक्रमक होताना दिसत आहे.
ॲमेझॉन कंपनीच्या विरोधात घोषणा -
पंढरपूर शहरातील अमेझॉन कार्यालयावर मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ॲमेझॉनच्या कार्यालयाबाहेर पोस्टरवर काळे फासून मराठी भाषा अमेझॉनच्या कारभारात वापरावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. अमेझॉनच्या कर्मचाऱ्यांना मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले. मनसेच्या वतीने जोरदाार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दोन दिवसात अमेझॉन कंपनीने मराठीत कारभार चालू करावा -
मनसेचे सरचिटणीस दिलीप बापू म्हणाले, ॲमेझॉन कंपनीने त्यांचा संपूर्ण कारभार हा मराठीत होणे गरजेचे आहे. मात्र, महाराष्ट्रात त्यांचा कारभार हा इंग्रजी भाषेमध्ये सुरू आहे. इतर राज्यांमध्ये अमेझॉन कंपनीने कारभार त्यांच्या भाषेत सुरू केला आहे, मग मराठी भाषेत का असू नये. मनसेकडून वेळोवेळी अमेझॉन कंपनीला याबाबत तक्रार देऊनही मनसेच्याा मागणीकडे पूर्णता दुर्लक्ष करत आहे. अमेझॉन कंपनीला मनसेकडून याबाबत इशाराही देण्यात आला होता. मात्र, मनसेकडून निवेदन देऊन पोस्टरला काळे फासलेचे आंदोलन करण्यात आले आहे. येत्या दोन दिवसांमध्ये अमेझॉन कंपनीने आपला कारभार मराठी भाषेत नाही सुरू केला तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा धोत्रे यांच्याकडून देण्या आला.
काय आहे मनसेची मागणी -
ई-शॉपिंग साईट असलेल्या अमेझॉन कंपनीने आपल्या वेबसाईट आणि अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा. मराठी भाषेचा समावेश केल्याने मराठी भाषिकांना वस्तू खरेदी करणे अधिक सोपे होईल अशी मागणी मनसेने केली होती. मात्र, अमेझॉन कंपनीकडून या मागणीला सकारात्मक प्रत्युत्तर आले नाही. यानंतर संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी सर्वत्र 'नो मराठी- नो अमेझॉन' ही मोहीम सुरू केली. मनसेच्या कार्यर्त्यांनी मुंबई आणि पुण्यातील अमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड केली. याबाबत ॲमेझॉन कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.