पंढरपूर - बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पनवेल येथून नंदू उर्फ बाबा पाटील यांनी ही धमकी दिली आहे. याप्रकरणी बार्शी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत चंद्रकांत खराडे (वय 40 रा. शिवाजी आखाडा, बार्शी) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...तर मुंबईतून बाहेर पडू देणार नाही
प्रशांत खराडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नंदू उर्फ बाबा पाटील यांनी आमदार राजेंद्र राऊत यांना धमकी दिली आहे. बार्शी येथील शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या विरोधात राजकारण करू नका, तुम्ही जर त्यांना विरोध केला तर, मी तुम्हाला मुंबईतून बाहेर पडू देणार नाही, त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर गाठ माझ्याशी आहे. तुम्हाला जिवंत सोडणार नाही. अशी धमकी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून देण्यात आली आहे. याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना नेते आंधळकर व राऊत गटात वाद
चार दिवसापूर्वी राऊत गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांचे शिवसेना कार्यालय फोडले होते. त्याबाबत बार्शी पोलीस ठाण्यामध्ये अमोल चव्हाण सह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता आंधळकर यांच्या पनवेल येथील कार्यकर्त्याकडून आमदार राजेंद्र राऊत यांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे दोन्ही गटात वाद होण्याची दाट शक्यता आहे.