सोलापूर - मंगळवेढा तालुक्यात साखर कारखान्यांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. काही महिन्यांनी श्री संत दामाजी सहकारी कारखान्याच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीमध्ये आमदार प्रशांत परिचारक यांचा गट सहभागी होणार आहे. यासंदर्भात परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांनी प्राथमिक स्वरूपाची बैठक घेऊन निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे.
परिचारक गट स्वतंत्र पॅनल उभे करणार -
मंगळवेढा तालुक्यातील सहकार क्षेत्राच्यादृष्टीने श्री संत दामाजी साखर कारखाना महत्त्वाचा आहे. कारखान्याच्या सभासदांना उसाचा योग्य तो दर मिळावा व कारखान्यातील कर्मचाऱ्यांची हित डोळ्यासमोर ठेवून परिचारक गट निवडणूक लढवणार आहे. गेल्या काही वर्षांपासून मोडकळीस आलेल्या संत दामाजी कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी आमदार परिचारक यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पॅनल उभा करण्याचा निर्धार परिचारक गटाकडून करण्यात आला आहे. या निवडणुकीसंदर्भात परिचारक गटाची लवकरच मीटिंग होणार आहे. त्यात निवडणुकीची दिशा ठरवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा दूध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवानंद पाटील, युन्नूस शेख व अरुण किल्लेदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
19 हजार सभासदांना ठरवले अक्रियाशील -
दामाजी कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने पोस्टाने नोटिसा पाठवून 19 हजार सभासदांना अक्रियाशील ठरवले आहे. 28 हजार सभासदांपैकी मोजकेच नऊ हजार सभासद ठेवले आहेत. त्यातील चार ते पाच हजार लोकांच्या नावावर कारखान्याचा ऊस दाखवत बोगस क्रियाशील सभासद करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात संत दामाजी कारखान्याचे संचालक मंडळ यशस्वी ठरल्याचा आरोप होत आहे. सध्या दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे हे आहेत.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कारखान्याची निर्मिती -
तालुक्यातील भीमा नदी परिसरातील मोठे ऊस क्षेत्र आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस दुसऱ्या तालुक्यातील कारखान्यांना पाठवावे लागत असे. अशा परिस्थिती मंगळवेढा तालुक्यात एक सहकारी साखर कारखाना निर्माण व्हावा, अशी इच्छा दिवंगत किसनलाल मर्दा यांची होती. त्यासाठी दोन टोकाच्या राजकीय भूमिका असलेल्या किसनलाल मर्दा व रतन शहा यांनी एकत्रित येऊन श्री संत दामाजी कारखान्याची उभारणी केली. दोघांनी एकत्रित येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून तालुक्यातील कारखाना वाढी संदर्भात प्रयत्न केले. त्यानंतर हा कारखाना अवताडे गटाकडे आला.