सोलापूर - भारतात ईडी हा शब्द आता सर्व परिचित झाला आहे. भ्रष्टाचाराची चौकशी, बेनामी मालमत्तेची चौकशी आता थेट ईडी मार्फत होत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील एका स्थानिक कार्यक्रमात एमआयएम वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा या पक्षांवर टीका करताना हे पक्ष कोणत्याही कामाचे नाहीत. एमआयएम आणि वंचित भाजप साठी काम करतात. शिवाय देशात कोणाविरोधात बोलले तर लगेच ईडी तुमच्याकडे येणार. ईडी म्हणजे पान तंबाखूची दुकान झाली आहे, असे वक्तव्य आमदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे.
'विरोधात बोलले तर माझ्याही घरावर ईडीची कारवाई होईल'
आज देशात भीतीचे वातावरण आहे. कोण कधी घरात घुसून चौकशी करतील, अटक करतील सांगता येत नाही. उद्या माझ्या घरावरही ईडीचा छापा पडेल. ईडी म्हणजे आज पान तंबाखूचे दुकान झाले आहे. ही भीती तयार करण्याचे षडयंत्र भारतीय जनता पक्षाने केले आहे, अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदेची टीका!
फेब्रुवारी 2022 मध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूका होणार आहेत. त्याअनुषंगाने सोलापुरात प्रत्येक पक्षाने कॉर्नर बैठका, उद्घाटन, मिटिंगचा सपाटा सुरू केला आहे. रविवारी सोलापूर शहरातील प्रभाग 15 मध्ये काँग्रेसचे खासगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. स्थानिक नगरसेवक व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार प्रणिती शिंदे हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. त्यावेळी भाषण करताना त्यांनी एमआयएम, वंचित आणि भाजपावर टीका केली. आगामी महानगरपालिका निवडणूका समोर ठेवून प्रत्येक पक्षातील नेते इतर पक्षावर टीका करत आहेत.
हेही वाचा - आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : 'एसआयटी' चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार - नवाब मलिक