सोलापूर - दलित वस्ती सुधारणा अंतर्गत डीपीडीसीच्या यादीत बहुतांशी नगरसेवकांची नावे वगळण्यात आली आहेत. ती नावे पुन्हा समाविष्ट करावी या मागणीसाठी शुक्रवारी पालिकेच्या सभागृहात विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे काही काळ महापौर श्रीकांचना यन्नम यांना पालिकेची सर्वसाधारण सभा काही काळापुरती तहकूब करावी लागली.
![महानगरपालिकेत नगरसेवकांचा गोंधळ](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sol-01-confusion-of-corporators-in-solapur-municipal-corporation-meeting-scheduled-10032_30012021013229_3001f_1611950549_730.jpg)
शुक्रवारी पालिकेची सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण सभागृहात महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली होती. सन 19 व 20 च्या प्रशासकीय अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यासाठी ही सभा बोलावण्यात आली होती. सभेला सुरुवात होताच नगरसेविका श्रीदेवी फुलारी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणेच्या यादीतून आमचा प्रभाग का वगळण्यात आला याचा खुलासा करावा, असा सवाल उपस्थित करत नगरसेविका श्रीदेवी फुलारी यांनी सभागृहनेते श्रीनिवास करली यांच्या हातातून बजेट बॅग काढून घेण्याचा प्रयत्न केला.
बजेटची बॅग काढून घेण्याचा प्रयत्न
अंदाजपत्रकीय सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेविका श्रीदेवी फुलारी यांनी घातलेल्या गोंधळामुळे सभागृहात गोंधळ उडाला. दरम्यान सभागृह नेते श्रीनिवास करली यांच्या हातून बॅग जाता कामा नये याची काळजी घेत भाजपचे नगरसेवक नारायण बनसोडे, रवी गायकवाड, संजय कोळी, वंदना गायकवाड यांनी नगरसेविका फुलारी यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र नगरसेविका श्रीदेवी फुलारी आपल्या मागणीवर ठाम असल्याचे चित्र दिसून आले.
महापौरांच्या डायससमोर ठिय्या
दरम्यान दलित वस्ती सुधारणा अंतर्गत तयार करण्यात आलेल्या यादीत बदल का करण्यात आला? असा सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या डायससमोर घोषणाबाजी करत सभागृहातच ठिय्या आंदोलन केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा अंतर्गत डीपीडीसीकडे पाठवण्यात आलेली यादी बदलून घ्यावी, असा प्रस्ताव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी घ्यावा. अन्यथा पालिका पदाधिकाऱ्यांनी तयार केलेल्या यादीच्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागू, असा इशारा यावेळी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी दिला.
गोंधळामुळे पालिकेची सभा तहकूब
सभागृहातील गोंधळ लक्षात घेऊन महापौर श्रीकांचना यन्नम यांनी पालिकेची सर्वसाधारण सभा एक तासासाठी तहकूब करत असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर सभागृहातील गोंधळ शांत झाला. पण एक तासानंतर सभा सुरू होताच पुन्हा गोंधळाला सुरुवात झाली. त्यानंतर महापौर यांनी शुक्रवारची सभा तहकूब केली.
हेही वाचा - दिल्लीमध्ये इस्राईलच्या दूतावासाबाहेर स्फोट; मुंबईमध्ये अलर्ट जारी