सोलापूर - लग्नासाठी मुलगी दाखवण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या टोळीतील तिघांना करमाळा पोलिसांनी अटक केली आहे. वधू-वर सूचक वेबसाईटचा गैरवापर करून लग्नास इच्छुक असलेल्या मुलाला करमाळा तालुक्यात बोलवून लुटल्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करून करमाळा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
'नवरी मिळे नवऱ्याला' या वेबसाईटचा गैरवापर करून हा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. वधू बघण्यासाठी आलेल्या सदस्यांच्या अंगावरील दागिने काढून व मुद्देमाल लंपास केल्याच्या दोन घटना करमाळा तालुक्यात घडल्या होत्या. या दोन कुटुंबांनी करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी अलबुळ्या बुट्या पवार (वय-४८), लाला काज्या काळे (वय-३२), कौशल्या काज्या काळे (वय-२८) या तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, या टोळीतील ८ जणांचा शोध सुरू आहे. आरोपींकडून तीन लाख ९४ हजारांच्या मुद्देमालापैकी अडीच तोळ्यांचे दागिने पोलिसांच्या हाती लागले आहेत.
सोरेगाव येथील विनायक चौगुले यांनी 'नवरी मिळे नवऱ्याला' या वेबसाईटवर नोंदणी केली होती. या नोंदणीनंतर करमाळा तालुक्यातील मुलगी पाहण्यासाठी ते 21 जुलैला वरकूटे येथे कुटुंबासोबत आले होते. गावाचा रस्ता सांगत असताना अनोळखी ठिकाणी नेऊन चौगुले कुटुंबियांना आरोपींनी मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील सोने, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ३ ते ४ लाखांचा मुद्देमाल लुटला.
यानंतर असाच दुसरा प्रकार दि.२६ जुलैला आशिष सुभाष शहा (रा.पारगाव-खंडाळा) यांच्यासोबत निंभोरे परिसरात घडला होता. त्याच्याकडून सोने, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता.
याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे व रवींद्र तेलतुंबडे यांच्या पथकातील प्रविण साठे, योगेश चितळे, मनिष पवार, सिद्धेश्वर लोंढे व अभिजीत जगदाळे यांना मिळालेल्या माहितीनुसार साडे येथून आरोपींना अटक करण्यात आली. फिर्यादीने सर्व आरोपींची ओळख पटवल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर सर्व आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अशा प्रकारच्या घटनांमध्ये फसवणूक होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी केले आहे.