सोलापूर- राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर सोलापुरातील मराठा समाजाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते तसेच विविध पक्षातील व संघटनातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.
सोलापूर शहरातील शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून पेढे वाटण्यात आले. सोलापूर शहरातील शिवाजी चौका बरोबरच वेगवेगळ्या परिसरात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून व पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी तरुण मुले आणि महिलांना फुगडीचा ठेका धरला होता.
आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे मान्य करत न्यायालयाने मराठा समाजाला दिलेल आरक्षण सुरु ठेवले आहे. १६ टक्के नाही मात्र, १२ ते १३ टक्के आरक्षण देता येवू शकते, असे न्यायालयाने निर्णयात म्हणले आहे. आरक्षणाचा निर्णय सरकार घेवू शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.