सोलापूर - अखिल भारतीय काँग्रेस पक्षाला सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार मराठा आरक्षणाच्या बाबतीत विरोधी भूमिका मांडत आहेत. त्यावरुन सकल मराठा समाजाचे सोलापूर समन्वयक माऊली पवार यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे. भविष्यातील निवडणुकीत कॉंग्रेसला जबरदस्त हादरा देऊ, असा इशारा माऊली पवार यांनी दिला आहे.
भविष्यात काँग्रेसच्या मत पेढीला हादरा
काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात उभा करण्यामध्ये मराठा समाजाचे प्रचंड योगदान आहे. आजही काँग्रेस पक्षामध्ये मराठा समाजाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. तरीही मंत्री विजय वडेट्टीवार हे मराठा समाजाला प्रत्येकवेळी ओबीसीच्या आरक्षणासाठी विरोध करत आहेत. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. काँग्रेसच्या राज्यातल्या व देशातल्या नेतृत्वाने याचा गांभिर्याने विचार करावा. अन्यथा मराठा समाजाच्या मतपेढीस भविष्यातल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला मुकावे लागेल. त्यामुळे काँग्रेसचे नेतृत्व कारणाऱ्यांनी त्वरित याची दखल घ्यावी, असा इशारा सकल मराठा समाजाकडून देण्यात आला आहे.
काँग्रेसला निवडणुकीत किंमत मोजावी लागेल
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारा मराठा समाज अनेक दिवसांपासून आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी करत आहे. समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याऐवजी राज्य सरकारने सर्व ओपन कॅटेगरीत 10 टक्के आरक्षणात मराठा समाजाला आर्थिकदृष्या मागास वर्गात समाविष्ट करून अन्याय केलेला आहे. त्यात भर म्हणून काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार मराठा समाजावर बेताल वक्तव्य करत आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत मराठा समाज काँग्रेसविरोधात भूमिका घेणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी बोलताना दिली.
हेही वाचा - परत कोल्हापूरला जायचं होतं तर पुण्यात आलात कशाला? अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला