सोलापूर - सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी यासह अन्य मागण्यांसाठी राज्य सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पंढरपूर ते मंत्रालय, असा वीस दिवसांचा पायी दिंडी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. याची सुरूवात 7 नोव्हेंबरपासून पंढरपुरातील नामदेव पायरी येथून करण्यात येणार आहे. मात्र, कोरोनाचा प्रसार होऊ नये, कोणत्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या एस. टी. बसेस बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला. तसेच 5 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 7 नोव्हेंबरच्या रात्री 12पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या आदेशाच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी (5 नोव्हेंबर) रात्री आदेशाची होळी केली.
मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, सकल मराठा समाज या संघटनांच्या वतीने मराठा आरक्षण मागणीसाठी 7 नोव्हेंबरपासून पंढरपूर-अकलूज-बारामती-आकुर्डी-निगडी-मावळ-वाशी या मार्गाने पायी दिंडी मोर्चा काढण्यात येणार आहे. संघटनांनी मराठा समाजातील नागरिकांना एकत्र येणास आवाहन केले आहे. या मोर्चामुळे एसटी बसेसमध्ये आंदोलनकर्त्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे. सुरक्षित अंतराचे पालन होणार नाही. आंदोलनकर्ते एकत्र आल्यास कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. यामुळे कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो आणि जनजीवन धोक्यात येऊ शकते. म्हणून संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
आज (दि. 5 नोव्हेंबर) 5 वाजता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश काढताच सोलापूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त केला. सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांनी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास चार पुतळा परिसरात आदेशाची होळी करून आंदोलन केले. अतिशय गजबजलेल्या ठिकाणी हे आंदोलन अचानक झाल्यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती.
हेही वाचा - मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात 7 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी