सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील अरळी गावच्या एका शेतकऱ्याने अंगावर राॅकेल ओतून बँक अधिकाऱ्यांसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी बॅंकेच्या जिल्हा अग्रणी बैठकीत हा प्रकार घडला. राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे पीककर्ज मिळत नसल्याच्या कारणावरून येथील एका शेतकऱ्याने निष्काळजी अधिकाऱ्यावर शाई फेकत पंचायत समितीच्या सभागृहात बॅंक अधिकाऱ्याच्या बी.एल.बी.सी. बैठकीत अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. शंकर संघशेट्टी असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
कोरोनाच्या संकटामध्ये शेतकऱ्यांना बँकेत येऊन होणारा त्रास वाचावा म्हणून शासनाने सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पीककर्ज मागणीचा अर्ज सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परंतु ऑनलाइन अर्ज केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप पीककर्जाचे वाटप झाले नसल्यामुळे व बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पंचायत समितीच्या सभागृहात सुरू असलेल्या अधिकाऱ्यांच्या बी.एल.बी.सी. बैठकीमध्ये घुसून शाईफेक करत तोंडाला काळे फासले.
यंदा पाऊस समाधानकारक पडून शेतात पिके चांगली येतील, या आशेने शेतकरी पीककर्ज घेण्यासाठी अर्ज करत आहे. बॅंक अधिकाऱ्यांकडून पीककर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या होत्या. परंतु याकडे बॅंक अधिकारी व जिल्हा प्रशासनाने सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
यामधील सर्वाधिक तक्रारी नदीकाठच्या भागात असलेल्या आरळी व माचणूर येथील आयसीआयसीआय बॅंकेबद्दल तक्रारी आहे. त्या बॅंकेच्या अधिकाऱ्यावर शाईफेक करण्यात आली. शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे एकंदरीत कोरोनाच्या संकटात बॅंक अधिकाऱ्यांच्या मुजोर व एकाधिकारशाही कारभाराकडे बँकेचे वरिष्ठ अधिकारी देखील दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले.
हेही वाचा : गडचिरोलीच्या घारगावमध्ये कोरोना पथकावर गावकऱ्यांचा हल्ला