सोलापूर - विवाहित महिलेच्या आत्महत्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. जगताप यांनी महत्वपूर्ण निकाल देत दिगंबर कृष्णात चाबुकस्वार (वय 30 वर्षे, रा. अवंतीनगर, जुना पुणे नाका, सोलापूर) यास तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. तर सासू पद्मिनी चाबुकस्वार, नणंद श्रीदेवी आणि दीर नागनाथ चाबुकस्वार या तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे.
आरोपी पती हा व्यसनी असल्याने पत्नीचा शारीरिक छळ
आरोपी पती दिगंबर यासोबत अश्विनीचा विवाह 2005 साली झाला होता. विवाहनंतर 2 वर्षांनी आरोपी पतीस गांजा व दारूचे व्यसन लागले होते. आरोपी पती हा पत्नी अश्विनीला नशेत मारहाण करत होता.
मृत अश्विनी ही स्वतः काम करून ओढत होती संसाराचा गाडा
पती दिगंबर हा व्यसनाच्या आहारी गेल्याने तो काहीही काम करत नव्हता. अश्विनी ही कुटुंबाचा, संसाराचा गाडा चालवण्यासाठी स्वतः एका खासगी कंपनीत कामाला जात होती. दिगंबर चाबुकस्वार हा तिच्याकडून पैसे घेऊन चारित्र्यावर संशय घेत होता.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत करत होता छळ
आरोपी पती हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच संशयातून त्याने पत्नीस मारहाण करत काम सोडण्यास भाग पाडले होते. त्यामुळे त्या तिने टोकेचा पाऊल उचलले.
सहनशक्ती संपल्यानंतर गुलाब जामूनमधून विष घेऊन संपवली जीवन यात्रा
पतीच्या रोजच्याच त्रासाला अश्विनी कंटाळली होती. अखेर तिने 1 सप्टेंबर 2019 रोजी गुलाब जामूनमध्ये रोगर नावाचे विषारी औषध मिसळले आणि खाल्ले. सासरची मंडळी अश्वीनीला जाच करत असल्याची तक्रार फोजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
न्यायालयात मृताची बहीण व डॉक्टराची साक्ष ठरली महत्वाची
न्यायालयात सरकारी वकील अॅड. प्रेमलता व्यास यांनी युक्तिवाद करताना पतीच्या त्रासाला कंटाळून अश्विनीने आत्महत्या केली असल्याचा युक्तीवाद केला. तसेच न्यायालयाने मृताची बहीण, डॉक्टर आणि इतर साक्षीदारांच्या साक्ष मानून, पती दिगंबर चाबुकस्वार याला दोषी ठरवून तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
हेही वाचा - वीज बिल भरू नका, 'वंचित'ची शहरात पोस्टरबाजी
हेही वाचा - मालमत्ता कर थकवला; वसुलीसाठी सोलापूर महापालिकेकडून माजी आमदारांची मालमत्ता सील