सोलापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra karnataka Border Dispute) ज्वलंत झाला आहे. दोन्ही राज्याच्या एसटी बसेस महाराष्ट्र व कर्नाटक सीमेपर्यंतच धावत असल्याची माहिती सोलापूर एसटी डेपोचे व्यवस्थापक दत्तात्रय कुलकर्णी यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र शासनाच्या एसटी बसेस सीमेवर अडविल्या होत्या. त्या बसेस गुलबर्ग्याला निघाल्या होत्या. कर्नाटक पोलिसांनी या सर्व बसेस अक्कलकोट डेपोकडे परत पाठवल्या. शनिवारी सकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या बसेस फक्त सीमेपर्यंत प्रवासी घेऊन जात आहेत. कर्नाटकच्या बसेस देखील सोलापुरात आल्या नाहीत. प्रवाशांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव सीमेपर्यंत सेवा: महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील सीमावाद आता एसटीच्या प्रवाशांपर्यंत पोहोचला आहे. कर्नाटकात महाराष्ट्रातील एसटी वाहनांना विरोध केला जात असून तिथे असुरक्षिता निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्नाटक पोलिसांनी सोलापुरातून गुलबर्ग्याकडे जाणाऱ्या एसटी गाड्यांना अक्कलकोटच्या सीमाभागात रोखले. शुक्रवारी सायंकाळी पाच ते साडेसहा दरम्यान एकूण पाच गाड्यांना कर्नाटकात जाण्यास रोखण्यात आले. कर्नाटक पोलीस कर्नाटकाच्या बसेस सीमेवरून परत गुलबर्गा,आळंद,विजयपूरकडे परत पाठवत आहेत. त्यामुळे नेहमी कर्नाटकाच्या दिसणाऱ्या बसेस दोन दिवसांपासून अदृश्य झाल्या आहेत.
पुढील आदेश येईपर्यंत सेवा फक्त सीमेपर्यंत: शुक्रवारी सायंकाळी कर्नाटक हद्दीत कर्नाटक पोलिसांनी प्रवेश रोखल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. एसटी महामंडळ प्रशासनाने प्रवाशांची क्षमा मागून जागीच तिकिटाचे पैसे परत केले आणि सीमेपासून परत अक्कलकोट आगारकडे बसेस निघाल्या. बस मधील प्रवासी खाजगी जीपने गुलबर्ग्याकडे रवाना झाले. सोलापूर-गुलबर्गा मार्गावरील हिरोळी सीमेजवळ तीन गाड्या तसेच दुधनीजवळील सिन्नूर सीमेजवळ दोन गाड्यांना कर्नाटक पोलिसांनी रोखले. साधारण ८२ प्रवाशांची गैरसोय झाली. या घटना घडल्यानंतर एसटीचे अधिकारी सतर्क झाले असून शनिवारी कनार्टकमधील परिस्थिती पाहून सोलापुरातून गाड्या रवाना होतील. अशी माहिती दत्तात्रय कुलकर्णी(डेपो मॅनेजर,सोलापूर आगार) यांनी दिली.