बार्शी (सोलापूर) - केंद्रीय सशस्त्र राखीव दल (सीआरपीएफ) मधील हुतात्मा जवान सुनील काळे यांच्या कुटुंबीयांची गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट घेतली. यावेळी कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले.
हेही वाचा... हुतात्मा सुनील काळेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मुंबईहून सोलापूर दौऱ्यासाठी निघालेल्या मंत्र्याचा ताफा शनिवारी सकाळी बार्शीमधील पानगावकडे वळला. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफमध्ये असलेले सोलापूरचे जवान सुनील काळे हे हुतात्मा झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांची आज या सर्व मंत्र्यांनी भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी त्यांनी हुतात्मा सुनील काळे यांच्या पत्नी, आई आणि कुटुंबातील इतर सदस्यांची भेट घेतली. तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. कुटुंबियांची भेट घेताना हुतात्मा सुनील काळे यांची दोन्ही मुले आणि पत्नीस सांत्वन करत त्यांची मागणी काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा सोलापूरकडे वळला.
हेही वाचा... राष्ट्रवादीच्या 'या' नगरसेवकाकडून पडळकरांचे समर्थन.. दुचाकीवरून शहरभर फिरवले