सोलापूर - महाराष्ट्रातील 33 अन्यायग्रस्त जमातीच्या नागरिकांवर होत असलेल्या शासन पातळीवरील अन्याया विरोधात महादेव कोळी संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी मुंबई मंत्रालय येथे आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मंत्री दशरथ भांडे यांनी दिली.
मोर्चाच्या माध्यमातून राज्यात आदिवासी जमातींवर गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून मनमानी पद्धतीने जो अन्याय होत आहे, तो अन्याय दूर करण्यासाठी सर्व अन्यायग्रस्त बांधवानी एकत्र येऊन हा मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन भांडे यांनी केले. या पत्रकार परिषदेत प्राध्यापक अशोक निंबर्गी, आंबदास कोळी, गणेश कोळी, सुधाकर सुसलादी, नागेश बिराजदार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
..या आहेत मागण्या
1) 6 जुलै 2017 सालच्या आधीपासून जे सेवेत आहेत, अशा सर्व कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण देऊन त्यांना सर्व लाभ तात्काळ द्यावे.
2) पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी जातीचे दाखले व प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करावी.
3) मृत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जात पडताळणी अट शिथिल करून निवृत्ती वेतनाचे सर्व फायदे अदा करावे.
4) महादेव कोळी व कोळी महादेव एकच असल्याचा शासन निर्णय पारित करावे.
5) जात पडताळणी समितीवर निवृत्त न्यायाधीशाची नेमणूक करावी.
6) 1950पूर्वीचा पुराव्याचा आग्रह धरू नये.
7) जात पडताळणी समिती ही विधी व न्याय खात्यांतर्गत कार्यान्वित करावी. ज्यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध झाले आहेत, त्यांना पुन्हा जात सिद्ध करण्याची संधी द्यावी.
8) अनुसूचित जाती जमातीच्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना करावी.
हेही वाचा - सोलापूरजवळ केमिकल टँकर व ट्रकची समोरासमोर जोरदार धडक; दोन्ही वाहने जळून खाक