पंढरपूर - कार्तिकी वारी निमित्ताने विठ्ठल मंदिर समितीकडून विठ्ठल मंदिराचे महाद्वार, रुक्मिणी द्वार, पश्चिम द्वार या प्रमुख प्रवेशांच्या ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. त्याशिवाय संपूर्ण मंदिर परिसर, तुकाराम भवन, दर्शन मंडपदेखील या रोषणाईने उजळून गेला आहे. आकर्षक पद्धतीने उंची झुंबर, पडदे लावत आले. यामुळे विठ्ठल मंदिराचे रूपडे पालटले आहे.
मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई
कोरोना महामारीमुळे कार्तिक वारी सोहळा साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. मात्र मंदिर समितीकडून विठ्ठल मंदिराच्या आतील बाजूसदेखील आकर्षक रोषणाई करण्यास सुरुवात केली आहे. विठ्ठल सभामंडप या आकर्षक रोषणाईने झगमगू लागला आहे. नामदेव पायरीजवळ अतिशय आकर्षक पद्धतीने एलईडी दिव्यांच्या माळा वापरुन रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराची शिखरे आणि मंदिरावर विविध रंगांच्या दिव्यांचे फोकस मारण्यात आल्याने विठ्ठल मंदिर अत्यंत मनमोहक दिसत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते होणार पुजा
पंढरपुरात कार्तिकी यात्रा निमित्ताने दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. यामध्ये भाविकांना पंढरीत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. विठ्ठलाची शासकीय पूजा एकादशीच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
पंढरपुरात आजपासून संचारबंदी
कार्तिक वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर शहर व आसपासच्या नऊ गावांमध्ये मंगळवार मध्यरात्री 12.00 वाजल्यापासून ते 26 नोव्हेंबरच्या रात्री 12.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी जारी केले.
'या' गावांमध्ये संचारबंदी
कार्तिक वारीसाठी राज्यभरातून भाविक पंढरपुरात येत असतात. वारी कालावधीत पंढरपुरात भाविकांची गर्दी होऊन कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने, संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने पंढरपूर शहरात आणि शहराच्या आजूबाजूला असलेल्या भाटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव-शिरढोण, आणि कौठाळी या ग्रामपंचायत 144 अंतर्गत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत.
हेही वाचा -कार्तिकी वारी पंढरपूरमध्ये एसटी बससेवेला सशर्त परवानगी, खासगी वाहनांना मात्र बंदी
हेही वाचा -कार्तिकी वारीत विठ्ठल- रुक्मिणीमातेचे मुखदर्शन तीन दिवस बंद राहणार