सोलापूर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण मंगळवेढा तालुक्यात आढळले आहे. शनिवारी ग्रामीण भागात 2 हजार 15 तर शहरी भागात 218 असे एकूण 2 हजार 233 बाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 45 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र दिनी सोलापूर ग्रामीणमध्ये 1133 तर शहरात 305 असे 1438 रुग्ण बरे झाले आहेत.
सोलापूरच्या ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य प्रशासनाने 10 हजार 687 जणांची तपासणी केली. त्यामध्ये 2015 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. ग्रामीण भागात 1133 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर 27 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील ग्रामीण भागात 14 हजार 484 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोलापुरात मंगळवेढा 463 रुग्ण, माळशिरस 410 रुग्ण, करमाळा 201 रुग्ण, बार्शी 129, माढा 170, पंढरपूर 273, मोहोळ 137, सांगोला 106 रुग्ण या तालुक्यात रुग्ण आढळले आहेत.
सोलापूर शहरात 218 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये 111 पुरुष आणि 107 स्त्रिया आहेत. तर 18 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये 11 पुरूष व 7 स्त्रिया आहेत. सोलापूर शहरात आजही 2850 रुग्ण अॅक्टिव्ह असून विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर सोलापूर शहरात आज 305 रुग्णांनी कोरोनावर मात केली.