सोलापूर- जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि पुरातन असलेल्या कुडलसंगम येथील संगमेश्वर मंदिर हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रावण सोमवारीदेखील बंद ठेवण्यात आले आहे. दरवर्षी श्रावण सोमवारी संगमेश्वर मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, यंदा मंदिर व परिसरात पहिल्यांदाच शुकशुकाट दिसून आला.
संगमेश्वर मंदिरामध्ये शिवमूर्ती असून श्रावण महिन्यात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. श्रावण सोमवारी आठ हजारांपेक्षाही जास्त भाविक दर्शनासाठी येतात. महाराष्ट्र आणि कर्नाटक तसेच आंध्रप्रदेशातूनदेखील भाविक या शिवमंदिरात दर्शनासाठी दरवर्षी येतात. कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरता मंदिर समिती व गावकऱ्यांनी मंदिर हे दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याचे संगमेश्वर देवस्थान सुधारणा समितीचे विश्वस्त मधुकर बिराजदार यांनी सांगितले.
असे आहे मंदिराचे महत्त्व
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमावर पुरातन आणि ऐतिहासिक असे संगमेश्वर देवस्थान आहे. भीमा आणि सीना नदीच्या संगमावर कुडल या गावी हे मंदिर असल्यामुळे कुडलसंगम या नावानेदेखील प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी उत्खननांमध्ये हरिहरेश्वर आची मंदिर सापडलेली असल्यामुळे याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मराठीतील पहिला शिलालेख याच संगमेश्वर मंदिरामध्ये आहे.
मंदिराचा परिसर हा श्रावण महिन्यात कायमच गर्दीने फुलून जातो. मात्र, हा परिसर आज श्रावणातील पहिल्या सोमवारीही निर्मनुष्य पाहायला मिळाला आहे.