सोलापूर - करमाळा तालुक्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुष्काळी परिस्थिती असताना देखील शासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. दुष्काळी उपाययोजना सुरू करण्यासाठी करमाळा तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी करमाळा तहसील कार्यालयावर हलगीनाद मोर्चा काढला.
करमाळा तालुक्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली असताना शासनाकडून प्रभावी अशा उपाय योजना झालेल्या नाहीत. त्यामुळे तालुक्यातील विविध मागण्यांसाठी करमाळा तहसील कार्यालयावर सोमवारी हलगीनाद मोर्चा काढण्यात आला.
करमाळा तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि नेत्यांच्या वतीने सोमवारी करमाळा शहरातील पोथरे नाका, महात्मा गांधी पुतळ्यापासून ते तहसील कार्यालय करमाळा या मार्गावरुन हा हलगीनाद मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्त्याच्या वतीने शासनाकडे विविध मागण्या ठेवण्यात आलेल्या आहेत.
त्यामध्ये गाव तेथे टँकरने पाणी पुरवठा तत्काळ सुरु करावा. वाड्या-वस्त्यावर पाण्याची सोय करण्यात यावी, गाव तेथे चारा छावणी सुरु करावी, चारा छावणीच्या अटी व नियम शिथिल करण्यात यावेत, रोजगार हमी योजनेची कामे तत्काळ सुरु करावीत, शासनाकडून सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, आदिनाथ व मकाई साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे थकित वेतन त्वरीत अदा करण्यात यावे, दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी, पिक विम्याची रक्कम त्वरीत अदा करण्यात याव्यात, दुष्काळी निधीचे वाटप त्वरीत करण्यात यावे, कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत नव्याने कर्जपुरवठा सुरु करावा, कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना त्वरीत कर्जमाफी देण्यात यावी, शेतकऱ्यांना ऊसाचे बील एफआरपी प्रमाणे तत्काळ अदा करण्यात यावे, रब्बी हंगामातील दुष्काळी निधीच्या शासनाच्या यादीत करमाळा तालुक्याचा समावेश करण्यात यावा, सध्या चालू असलेले कुकडीच्या पाण्याने मांगी तलावासहीत सर्व पाझर तलाव भरण्यात यावेत या मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.
या मोर्चामध्ये कष्टकरी, कामगार, शेतकरी सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. करमाळा तालुका हमाल पंचायतीचे अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य अॅड.राहुल सावंत, बहुजन वंचित आघाडीचे जिल्हा अध्यक्ष दशरथ कांबळे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख महेश चिवटे, शहर प्रविण कटारिया, आरपीआयचे अर्जुन गाडे, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे बाळासाहेब गायकवाड, मनसेचे बापू घोलप, अजय बागल, सुनिल सावंत आदींची भाषणे यावेळी झाली. करमाळ्याचे नायब तहसीलदार शांताराम किरवे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.