सोलापूर- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून करमाळा तालुक्यातील चिखलठाण गावात ग्रामपंचायतीने जनता कर्फ्यू लावला आहे. कर्फ्यूदरम्यान गावावरती ड्रोन कॅमेऱ्याने पाळत ठेवली जात आहे. या ड्रोन कॅमेऱ्याची सुविधा सरपंच चंद्रकांत सरडे यांनी स्व: खर्चातून केली आहे.
चिखलठाण गाव हे सोलापूर जिल्हा व पुणे जिल्ह्याला जोडणारा उजनी धरणाचा भाग आहे. उजनी जलाशयातून बोटीच्या माध्यमातून चिखलठाणकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. ती वाहतूक ग्रामस्थांनी बंद केली असून जेऊर-चिखलठाण रोडवरती चेकपोस्ट नाका तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी गावातील सर्व मंडळाचे सभासद सोयीनुसार बंदोबस्त करत आहेत. या चेकपोस्टवरती गावात ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनांची रजिस्टरमध्ये नोंद करण्यात येत आहे. जनता कर्फ्यूला ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कर्फ्यूदरम्यान ड्रोन कॅमेऱ्यद्वारे नजर ठेवणारे चिखलठाण हे गाव करमाळा तालुक्यातील पहिलेच गाव आहे.
हेही वाचा- सोलापुरात कोरोनाचा कहर : एकाच दिवशी 48 रुग्णांची वाढ, बाधितांची संख्या 264वर