सोलापूर - शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आपल्या गावात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केम ग्रामपंचायतीच्या वतीने २२ ते २४ मार्चपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. याला ग्रामस्थांकडून शंभर टक्के प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
जनता कर्फ्युला केम येथील जनतेने शंभर टक्के प्रतिसाद दिला असून गावातील रुग्णालये व औषध दुकाने वगळता सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. पेट्रोल पंप देखील बंद असलेला पाहायला मिळाला. केम ग्रामपंचायतीने स्थानिकांची योग्य ती काळजी घेतली आहे. गावातील शिवशंभो वेशीमध्ये सॅनिटायझर मशिनच्या सहाय्याने नागरिकांवर फवारणी करून त्यांना प्रवेश दिला जात आहे. तसेच गावात येणारे सर्व रस्ते सील करण्याचे काम स्वयंसेवक करीत आहेत. बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांवर करडी नजर ठेवली जात असून त्यांची नोंद ग्रामपंचायतीमध्ये केली जात आहे. यासाठी ग्रामसेवक नवनाथ सातव, सरपंच आकाश भोसले, माजी सरपंच अजित तळेकर, उपसरपंच नागनाथ तळेकर, सदस्य राहुल कोरे तसेच स्वयसेंवक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी हे अहोरात्र परिश्रम घेत आहेत. कोरोनाला हरविण्यासाठी घरीच थांबा व सहकार्य करा, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.