सोलापूर : दोन दिवसांपूर्वी सोलापूर ड्रगिस्ट एंड केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर औषध प्रशासन विभागाच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. त्याची दखल घेत राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने चौकशी अधिकारी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे येथील सहआयुक्त सुरेश पाटील लवकरच सोलापूर येथील दौरा करणार आहेत.
सोलापूर ड्रगिस्ट एंड केमिस्ट असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदेत आरोप केला होता की, सोलापूर येथील जिल्हा औषध प्रशासन विभाग जिल्ह्यातील औषध दुकानांची तपासणी करून किरकोळ चुकांसाठी अवाढव्य रकमेची मागणी करणे. तसेच रकमेची पूर्तता न केल्यास औषध विक्री दुकानाचा परवाना रद्द करणे, असे गंभीर आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आले होते. सोलापूर ड्रगिस्ट एंड केमिस्ट असोसिएशनच्या सभासदांनी अनेक वेळा असोसिएशनला सोलापूर औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी केल्या होत्या.
कोरोना महामारीच्या काळात अनेक मेडिकल व्यवसायिक आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा देत आहेत. अशा परिस्थितीत औषध प्रशासन कोणतेही मार्गदर्शन करत नसून उलट काही ना काही तुघलकी आदेश बजावत असल्याची कैफियत असोसिएशनच्या वतीने सांगितली होती. याउलट सोलापूर औषध प्रशासन विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची संपत्ती उत्पनापेक्षा अधिक आहे. याबाबतची माहिती अधिकारी दडवत असल्याचा आरोप असोसिएशनने केला होता. या पत्रकार परिषदेत अध्यक्ष बसवराज मणुरे, सचिव राजशेखर बोराळे, इनामदार आदी उपस्थित होते. याची गंभीर दखल राज्य अन्न व औषध आयुक्त अरुण उन्हाळे यांनी घेतली आहे. येत्या एक दोन दिवसात पुणे येथील सहआयुक्त सुरेश पाटील चौकशी अधिकरी म्हणून दाखल होणार आहेत.