सोलापूर - पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी 5 लाख रुपयांची लाच मगितल्याचा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी बार्शी शहरासह तालुक्यात व्हायरल झाला होता. याप्रकरणी आता उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांनी चौकशी सुरू केली आहे.
संचारबंदीच्या दरम्यान बार्शी शहरातील हळद गल्लीतील चांदमल ज्वेलर्स हे दुकान चालू होते. त्यामुळे पोलिसांकडून अमृतलाल चांदमल यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र, अमृतलाल चांदमल यांनी पोलीस निरीक्षक यांनी कारवाई टाळण्यासाठी 5 लाखांची मागणी केल्याचा आरोप केला होता. यावरून आता पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची चौकशी होणार आहे. बार्शी येथील चांदमल ज्वेलर्सचे मालक अमृतलाल गुगळे यांच्यावर कारवाई टाळण्यासाठी पाच लाखांची मागणी केल्याची तक्रार गुगळे यांनी केली होती. विशेष म्हणजे पैशांची मागणी करताना त्यात थेट गृहमंत्र्यांपर्यंत ही रक्कम पोचवावी लागते, असा उल्लेख केल्याचे गुगळे यांनी सांगितल्याने हे प्रकरण गंभीर बनले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यापर्यंत या बाबतच्या तक्रारी गेल्यानंतर पोलीस महासंचालक स्तरावरून या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे विशेष पोलीस महानिरिक्षकांनी मिलिंद मोहिते यांना या चौकशीचे पर्यवेक्षण करण्यास सुचविले होते. त्यानुसार मोहिते यांनी या चौकशीची सर्व माहिती घेत पोलीस महानिरीक्षकांना त्याची माहिती दिली. या बाबतचा अंतिम अहवाल अभिजीत धाराशिवकर हेच सादर करणार आहेत, असेही बारामती अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहिते यांनी नमूद केले. या प्रकरणी दोन्ही बाजूंशी बोलून वस्तुस्थिती वरिष्ठांपर्यंत पोहोचविणाचे काम केले जाईल, अहवाल सादर झाल्यानंतर वरिष्ठच याबाबत काय असेल तो निर्णय करतील, असे मोहिते यांनी सांगितले.
या प्रकरणातील सर्व आरोप पोलीस निरीक्षकांनी फेटाळले असून सराफा व्यापाऱ्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.